लख्ख सूर्यप्रकाश नाहीसा होणार; काळ्या ढगांची दाटी होत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

देशभरात सध्या राज्या-राज्यानुसार हवामानात बदल होत असून, अगदी एकाच राज्यातही हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पूर्वोत्तर भारतामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर भारतात मात्र उष्णतेचा कहर सुरूच आहे. तिथं हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागांमध्ये तापमानात घट झाली असून, काही ठिकाणी हिमवृष्टीसही सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्याच एप्रिल अखेरीस राज्यातील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही अंशी तापमानात घट झाली आहे, तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होताना दिसत आहे.

विदर्भात तापमानाचा पारा घसरला… 

विदर्भातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा काही अंशांनी घसरला असून, त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवत या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उर्वरित महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा

पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील हवामान बहुतांशी कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची घट नोंदवली जाईल. तर कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा या भागांमध्येही तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येईल.

 राज्यात सध्या तापमानात घट होत असली तरीही मराठवाड्याच्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडमध्ये मात्र तापमानाचा आकडा चाळीशीपार म्हणजेच 42 ते 43 अंशांच्या घरात आहे. पुढील दोन दिवसांत ही स्थिती कायम राहणार असून, हवेत दमटपणा आणखी वाढल्यानं उष्मा अधिक भासू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *