डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण? मनिषा मानेच्या मोबाईलमधल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचं गुपित काय?

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणामध्ये मनीषा माने या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी मनीषा माने यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता मनीषा मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?

मनीषा माने या 2008 पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. सध्या त्या एओ म्हणजेच विशेष अधिकारी म्हणून काम करत होत्या. 17 एप्रिल रोजी मनीषा यांनी डॉ.वळसंगकर यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये पगार कपात होत आहे असा एक मेल पाठवल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याबद्दल काही वाईट सांगितले जात आहे. माझ्यावर आरोप होत आहेत. माझी बदनामी होत आहे. ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करते, असा मेल त्यांनी डॉक्टरांना पाठवला होता. 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलला बोलवून घेतले. तेव्हा या महिलेने डॉक्टरांची माफी मागितली होती. माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी संध्याकाळी घरी जाऊन रिवाल्वर मधून गोळ्या घालून आत्महत्या केली, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकरांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे असल्याचं पोलिसांनी कोर्टासमोर या चिठ्ठीबद्दल बोलताना सांगितलं.

मनीषा मनेच्या वकिलांचं म्हणणं काय?

डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी आहे, असं ॲड. प्रशांत नवगिरे यांनी म्हटलं आहे. मनीषा माने यांच्यावर खोटी केस करण्यात आल्याचा मानेंच्या वकिलांचं म्हणणं आहे. “प्रख्यात मेंदूरोग तज्ञ असणारे डॉक्टर अशा किरकोळ कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून. हे बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर करण्यात आली आहे,” असा युक्तिवाद आम्ही मांडल्याचं मनीषा मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. “जेव्हा कोठडी संपेल तेव्हा आम्ही जामिनासाठी अर्ज करू,” असंही ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले. “मनीषा माने यांच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही,” याकडेही ॲड. प्रशांत नवगिरे यांनी लक्ष वेधलं आहे. “मनीषा यांच्यावर आरोप एवढाच आहे की त्यांनी डॉक्टरांना मेल केला होता. या मेलमध्ये त्यांनी डॉक्टरांना माझी पगारकपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे, असं म्हटल्याचं  ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले.

डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत

मेल प्रकरणानंतर डॉ. शिरीष वळसंगकरांनी मनीषा यांना रुग्णालयात बोलावून माफी मागून घेतली. कर्मचाऱ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना बोलवून घेतलं. ती दुष्ट असतील तर तिला बोलून घेण्यात आलं नसतं. एक दिवसाची पगार कपात केली एवढाच विषय असल्याचं ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले.  “माझ्या आशिलाद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की, मी फक्त मेल केला आहे बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत. मी हा असा मेल पाठवल्याने डॉक्टर व्यथीत झाले होते, असं मनीषा यांनी म्हटलंय,” असंही ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं आहे.

मनीषा यांच्या फोनमध्ये ती गुप्त माहिती

तसेच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातीत काही कौटुंबिक वादामधील गोपनीय गोष्टींची माहिती मनिषा यांना होती. त्याबाबतचे काही मेसेस तसेच ऑडिओ क्लिप मनीषा यांच्या मोबाईलमध्ये आहेत स्वत: मनीषा यांनीच ही माहिती मला दिली असल्याचा दावा ॲड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. त्यामुळे ही गोपनीय माहिती नेमकी काय आहे? याबद्दल पुढील सुनावणीमध्ये काही माहिती समोर येते का? या माहितीमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *