पाकिस्तानातील वादळी वाऱ्यांमुळं बिघडलं भारतातील हवामान; तापमान 45 अंशांवर पोहोचूनही होणार अवकाळीचा मारा…

एप्रिल महिना अखेरच्या टप्प्याकडे कूच करत असतानाच राज्याच उष्णतेची तीव्रता आणखी वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. मे महिन्यातील होरपळीची भीती आतापासून नागरिकांच्या मनात घर करत असतानाच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांना अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

कमाल तापमान 45 अंश, तरीही अवकाळीचा मारा? 

राज्यात सध्या ब्रम्हपुरी इथं सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून, सलग दुसऱ्या दिवशी इथं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. इथं तापमानाचा कमाल आकडा  45.9 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान एकिकडे ही होरपळ सुरू असतानाच दुसरीकडे मात्र काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या काही भागांना ढगांच्या गडगडाटासह पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, गडचिरोली  आणि चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार ते सोमवारदरम्यान विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

किमान दिलासा मिळणार…

राज्यात आर्द्रतेचं प्रमाण वाढत असतानाच एप्रिल अखेरपर्यंत उष्ण या वातावरणापासून नागरिकांना किमान दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत मात्र तापमानात काही अंशांची घट झाली असली, तरीही दमट वातावरणामुळं उष्मा मात्र जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट-उष्ण वातावरणापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पाकिस्तानातील वाऱ्यांचा भारतावर असाही परिणाम… 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार, सध्या मध्य पाकिस्तानवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं दिल्लीपासून संपूर्ण उत्तर पश्चिम भारतामध्ये हवेचा एकंदर प्रवाहच बदलला असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 48 तास या दक्षिण पश्चिम वाऱ्यांचा भारतावर सातत्यानं परिणाम होत राहील असा प्राथमिक अंदाजही वर्तवत देशातील हवामानाची स्थिती यामुळं बदलेल असा इशारा जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *