अघोरी पूजा आणि विवस्त्र मुली…; नागपुरात पैशांचा पाऊस पाडतो सांगत भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

विविध स्तरांवर आणि विविध माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य सुरू असतानाच नागपूरमधील एका घटनेनं समाज नेमका कोणत्या दिशेला चालला आहे हाच बोचरा प्रश्न उपस्थित केला आहे. नागपुरात अंधश्रद्धेपोटी केलेल्या एका विचित्र पुजेसंदर्भातील माहिती समोर येताच पोलिसांनी धडक कारवाई केली.

इथं पैशांचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून एका भोंदू बाबा ने तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याबाबतची माहिती मिळताच या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबासह एकूण आणखी दोन आरोपींना अटक केली.

अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा ने नागपुरात काही जणांना पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, आणि त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील असं सांगत तिन्ही मुलींना पूजेच्या वेळी नग्नावस्थेत बसावे लागेल अशी बतावणी केली होती. त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली.

काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबा ने तीनही अल्पवयीन मुलींचे एका मामागोमाग एक शारीरिक शोषण केले. मुलींना यासाठी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. भोंदू बाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही. मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ झाल्याचे समजले. एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्फत या तिघींनी नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ज्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरेशी सह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांना आरोपींच्या मोबाईल मध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का याचा शोध आता घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *