मुंबईत फक्त फोनवर जोरात बोलत असल्याने 25 वर्षीय तरुणाने 30 वर्षीय सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने सहकाऱ्याला इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर खाली ढकललं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त फोनवर जोरात बोलत असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. फोनवर जोरात बोलत असल्याने आयपीएल सामना पाहण्यात व्यत्यय येत असल्याच्या कारणास्तव आरोपीने थेट त्याला दुसऱ्या माळ्यावरुन खाली ढकललं.
आरोपी अफसर जमीरुद्दीन आलम आणि त्याचा सहकारी जितेंद्र चौहान हे कांदिवली (पश्चिम) येथील भाटिया शाळेसमोरील साई नगर येथील एका बांधकामाधीन इमारतीत कामगार होते. ते कामगारांसाठी असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत राहत होते.
रविवारी रात्री सुतार असणारा चौहान फोनवर मोठ्याने बोलत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. यादरम्यान आलम त्याच्या मोबाईल फोनवर आयपीएल सामना पाहत होता. चौहान फोनवर जोरात बोलत असल्याने आलम संतापला. चौहानशी त्याचा वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली. यादरम्यान आलमने चौहानला इमारतीवरुन खाली ढकललं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
चौहान दुसऱ्या मजल्यावरून बेसमेंट पार्किंगमध्ये पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असं त्याचा मित्र मनोजने एफआयआरमध्ये सांगितलं आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी चौहानला शताब्दी रुग्णालयात नेलं, जिथे सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मनोजच्या जबाबावरून, कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आलमला अटक केली.कांदिवली पोलिसांच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे.
