त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे पास विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २२ मार्च रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी गुजरातच्या सुरत येथील भाविक दर्शनासाठी आले असता मंदिराच्या प्रवेशद्वारावर भेटलेल्या व्यक्तीने व्हीआयपी दर्शनासाठीची प्रत्येकी दोनशे रुपये मूल्याची तीन तिकिटे संबंधित भाविकांना दोन हजार रुपयांत विकली. मात्र, दर्शन पाससाठी संबंधिताचा आधार क्रमांक जुळवला जातो. तिन्ही पास इतरांच्या आधार क्रमांकावर काढलेली असल्याने सुरतच्या भाविकांचे आधार क्रमांक त्याच्याशी जुळले नाहीत. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्राने ती स्वीकारली नाहीत. साहजिकच सुरक्षा रक्षकांनी या भाविकांना प्रवेश दिला नाही, त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.
याबाबत आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने भाविक चिराग दालिया यांनी ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली. अध्यक्षांना तक्रारअर्ज दिला. सदर व्यक्तीचे नाव नारायण असल्याचा उल्लेख अर्जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज राखून ठेवले
ट्रस्टने याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असून, ते राखून ठेवण्यात आले आहे. २३ मार्च २०२५ रोजी अमित माचवे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून मंगळवारी (दि. १५ एप्रिल) फिर्याद दाखल करून घेण्यात आली. याबाबत नारायण या व्यक्तीवर कलम ३१८ (४) प्रमाणे ठकबाजीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
