तुमच्या-आमच्या ताटातून वरणभातसुद्धा गायब होण्याची भीती आहे. कारण तूरडाळीनं किलोमागे तब्बल 200 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
ठोक बाजारात तूरडाळ 160 रुपये, तर किरकोळ बाजारात तुरीचा भाव तब्बल 200 रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं गृहिणींचं किचनचं बजेट साफ कोसळलं आहे.
यंदा देशभरातील बहुतेक राज्यांवर दुष्काळाचं सावट आहे. मराठवाड्यात 38 टक्के तर राज्यभरात तब्बल 30 टक्के कमी पाऊस पडला.
त्यामुळं यंदाही कडधान्य आणि डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याआधीच डाळीनं 200 रुपयाचा टप्पा गाठल्यानं पुढच्या वर्षभरात डाळ फक्त म्युझियममध्ये पाहण्यापुरतीच राहील की काय अशी भीती गृहिणी व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे देशात डाळीचा भाव कडाडल्याने सरकारने तुरीची ५ हजार टन अतिरिक्त डाळ आयात करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. या आयातीमुळे स्थानिक बाजारात डाळीची उपलब्धता वाढेल आणि वाढत्या भावावर नियंत्रणही राहील, असा विश्वास सरकारला आहे.
डाळ का कडाडली?
* दुष्काळ, अवकाळी पावसाचं सलग दुसरं वर्ष. त्यामुळे सर्व डाळींच्या उत्पादनात घट
* यंदा डाळीच्या उत्पादनात साधारण 20 लाख टन घट झाल्याच अंदाज
* तूरडाळीच्या दरात यंदा 82 टक्के वाढ. हरभरा 51, उडीद 40 टक्क्यांनी महाग
* डाळींबाबत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक असूनही सर्वात मोठा आयातदारही आहे.

