एमएमसीच्या निवडणुकीत मतदान वाढीचे आव्हान

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (एमएमसी) निवडणूक ३ एप्रिल रोजी होत असून सर्वच उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सुट्ट्यांमध्ये उमेदवारांनी मतदार डॉक्टरांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र मतदान प्रक्रियेतून वगळण्यात आलेले ७० हजार डॉक्टर, जिल्ह्यात एकच मतदान केंद्र, कामाच्या दिवशी मतदान असल्यामुळे अनेकांना मतदान करणे शक्य होणार नाही, अशा विविध कारणांमुळे मागील तीन निवडणुकांप्रमाणे यंदाही मतदान २० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मतदान वाढविण्याचे मोठे आव्हान उमेदवारांबरोबरच निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आहे.

राज्यातील डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या निवडणुकांमध्ये तंत्रज्ञानाबरोबरच विविध पर्याय उपलब्ध करत असल्याने देशविदेशातील डाॅक्टर निवडणूक प्रक्रियेमध्ये सहज सहभागी होतात. त्यामुळे भरघोस मतदान होत असते. मात्र डॉक्टरांची शिखर परिषद असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून मतदानासाठी विविध पर्याय उपलब्ध न करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचाही वापर करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी निवासी डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, परराज्यात व परदेशात रुग्णसेवा करत असलेले डॉक्टर तसेच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे मागील तीन निवडणुकांमध्ये एमएमसीच्या निवडणुकीमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *