…म्हणून मुंबईत येणार 2500000 किलो वजनाचं अवाढव्य मशीन; 150 ट्रक वापरावे लागणार

ठाणे-बोरीवली बोगद्याचं काम अत्यंत वेगाने सुरु असून या प्रकल्पामधील सर्वात आव्हानात्मक टप्पा पूर्ण करण्यासाठी विशेष मशीन मागवलं जाणार आहे. ठाणे आणि बोरीवलीदरम्यानचा बोगदा खोदण्यासाठी सर्वात मोठे टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) मुंबईत जून महिन्यात दाखल होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी आणले जाणारे सदर टीबीएम मशीन 2500 टन वजनाचे आहे. एवढं अवाढव्य मशीन आणण्यासाठी सुमारे 150 ट्रकची मदत घेतली जाणार आहे. या ट्रक्समधून मशीन मुंबईत आणले जाणार आहे. या यंत्रामध्ये 13.2 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता असून, भारतात वापरले जाणारे हे सर्वात मोठे मशीन आहे.

या आधीही वापरण्या आलंय असं मशीन पण…

मुंबईत सागरी किनारा मार्गासाठी आणि मेट्रो 3 प्रकल्पातही टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला होता. मात्र या मशीनची क्षमता 12 मीटर व्यासाचा बोगदा खोदण्याची होती. तर आता ठाणे-बोरिवली मार्गासाठी याहून अधिक मोठी मशीन वापरली जाणार आहे. या प्रकल्पात दोन जुळे बोगदे उभारण्यासाठी एकाचवेळी चार टीबीएम वापरले जाणार आहे. त्यातील पहिले टीबीएम जूनमध्ये मुंबईत दाखल होणार असून, त्यातून प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चेन्नईमध्ये झाली चाचणी

या मशीनचे बहुतांश सुट्टे भाग मेघा इंजिनिअरिंगने तयार केले असून, काही विशेष भाग मूळ जर्मन कंपनीतून आयात करण्यात आले आहेत. या मशीनचे वजन तब्बल 2500 टन इतके आहे. मशीनची चेन्नईतील कारखान्यात फॅक्टरी एक्सेप्टन्स चाचणी पूर्ण झाली आहे. आता मशीनचे सुट्टे भाग जूनपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत.

जोडणीसाठी लागणार दोन महिने

या टीबीएम मशीनचा पहिला भाग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत येईल. सर्व भाग जूनपर्यंत दाखल झाल्यानंतर त्याच्या जोडणीचे काम ऑगस्टअखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर हे टीबीएम शाफ्टमध्ये उतरविले जाईल. त्यामुळे प्रत्यक्षात भुयारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

असा आहे ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्प

प्रकल्पाची एकूण लांबी – 11.8 किलोमीटर
एकूण बोगदे – प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी दोन जुळे बोगदे
बोगद्याची लांबी – 10.25 किलोमीटर
पोहोचण्यासाठीचा मार्ग – 1.55 किलोमीटर
प्रकल्प खर्च – 18,838 कोटी रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *