लोकच कुणाल कामराच्या खात्यावर पाठवतायेत पैसे! 2 दिवसात जमले 4 कोटी 7 लाख रुपये, कारण…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 353 (b) 1  म्हणजेच, सोशल मीडियावर  खोटी बातमी पसरवणे व समाजात अशांती पसरवणे, कलम 352 (2) दोन गटांमध्ये वैर निर्माण करणे तथा शांतता भंग करणे, 356 (2) प्रतिष्ठत व्यक्तीची बदनामी करणे अशी कलम लावण्यात आली आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास आर्थिक दंड व साधा कारावास शिक्षेची तरतूद असल्याने कुणालच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे कुणाल कामरासाठी आता त्याचे समर्थक पुढे सरसावले असून त्याला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत मागील काही दिवसांमध्ये मिळाली आहे.

कोट्यावधी रुपयांची मदत

कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. एकीकडे कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात आहे. याचवेळी कुणालच्या कायदेशीर लढ्यासाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असून दोन दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. कुणालने महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र-  भारतासह इतर देशांतील चाहतेही व्यक्त करीत आहेत. याचवेळी कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा तुफान ओघ सुरू झाला आहे. या मदतीच्या रूपात दोन दिवसांत कुणालच्या खात्यात तब्बल 4 कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पदेशी चलनामध्येही मिळाली मदत

कुणाल कामराच्या युट्यूब अकाऊंटवरील व्हिडीओखाली कमेंटमध्ये अनेकांनी त्याला पैसे पाठवत असल्याचं म्हटलं आहे. भारतीयांनी 400 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतची मदत कामराला पाठवली आहे. केवळ भारतच नाही तर संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेमधूनही कुणाल कामराला मोठी मदत केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *