शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात… आता महसूल आणि वन विभागाचे निर्देश

उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या वेगवेगळ्या विभागांसाठीच्या सूचना असून, शिक्षण विभागाला दिलेल्या सूचनांमध्ये शाळेच्या वेळेमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुटी द्यावी, उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, तसेच परीक्षा सकाळच्याच सत्रात घेतल्या जाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यंदा वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील उन्हाची तीव्रता, पाण्याची टंचाई याबाबतच्या अडचणींमुळे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालकांकडून या वेळापत्रकाला विरोध करण्यात आला आहे. मात्र, या विरोधानंतरही राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने वेळापत्रकात बदल केलेला नाही. या पार्श्वभूमीवर, महसूल आणि वन विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, महापालिका, नगरपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करायच्या मार्गदर्शक सूचना नमूद करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *