कुणाल कामराच्या स्टँडअपनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली आहे. दरम्यान याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आले आहेत. सत्ताधाऱी आमदारांनी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली आहे. तर विरोधकांनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे.
कामरा नेमकं काय म्हणाला?
“महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले. मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील एकाने सुरु केलं होतं,” असं म्हणत कुणालने पुढे ‘भोली सी सुरत, आँखो मे मस्ती’ गाण्याच्या चालीवर एक गाणं सादर केलं. यामध्ये त्याने ठाण्यातील रिक्षा, चेहऱ्यावर दाढी, डोळ्यावर चष्मा असा उल्लेख गाण्यामधून केला आहे. तसेच पुढे बोलताना, “एक झलक दाखवून कधी गुवहाटीमध्ये लपले,” असंही म्हटलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांबरोबर काही काळ गुवहाटीमध्ये वास्तव्यास असल्याचा संदर्भ यामधून देण्याचा प्रयत्न कामराने केला आहे.
“पक्ष बदलणारी व्यक्ती”
याच गाण्याच्या चालीत कामराने, “माझ्या नजरेतून पाहिलं तर ती व्यक्ती गद्दार आहे,” असंही म्हटलं आहे. “मंत्री नाही तर ती व्यक्ती पक्ष बदलणारी आहे, अजून काय सांगू?” असंही कामराने म्हटलंय. “ज्या थाळीत खाल्लं त्याच थाळीत त्यांनी छिद्र केलं,” असंही कामराने या गाण्यात म्हटलं आहे. “राजकीय परिवारवाद संपवायचा होता म्हणून यांनी बाप चोरला असं यांचं राजकारण आहे,” असं कामराने गाण्यात म्हटलं आहे.
दरम्यान हॅबिटट स्टुडिओ जिथे हा कार्यक्रम झाला त्यांनी कुणाल कामराच्या विधानापासून फारकत घेतली असून आपला काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. परफॉर्मरने केलेल्या विधानासाठी आम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
स्टुडिओच्या मालकांनी आम्ही सध्या तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.. “स्वतःला आणि आमच्या मालमत्तेला धोक्यात न घालता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधल्याशिवाय आम्ही बंद करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं आहे.
