धारावीत भीषण स्फोट झाला आहे. आहे. सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्याने एकामागोमाग एक स्फोट झाले आहेत. सिलिंडर स्फोटांच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. धारावीच्या पीएनजी कॉलनी जवळ नेचर पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलग 15 ते 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अद्याप तरी कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली आहे. अग्निशन दलाला 10.14 च्या सुमारास याची माहिती मिळाली. ही लेव्हल 2 ची आग आहे. सायन धारावी लिंक रोडवर पीएनजीपी कॉलनीजवळ नेचर पार्क येथे हे स्फोट झाले.
खासदार वर्षा गायकवाड यांनी अनधिकृतपणे होणाऱ्या पार्किंगला यासाठी जबाबदार धरलं आहे. “माझं तेथील स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आहे. लोक घाबरले आहेत. नॉन पार्किंग झोनमध्ये गाड्या पार्क केल्याने अशा घटना घडत आहे. मुंबईकरांच्या जीवनाशी खेळलं जात आहे. तो व्हीआयपी रस्ता असून तिथे बेकायदेशीरपणे पार्किंग केली जाते. गॅस असणारी गाडी वाऱ्यावर सोडून निघून जातात,” असा आरोप त्यांनी केला आहे.
