कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातील हेब्री तालुक्यामध्ये गर्द वनराईत असलेल्या तिंगळे या गावी ‘धर्म-कला-साहित्या’चा जागर नुकताच पार पडला. यावेळी मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले यांची खास उपस्थिती होती. या महोत्सव तिंगळे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तिंगळे विक्रमार्जुन हेग्गडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत दिमाखदार व वैभवसंपन्न वातावरणात आयोजित केला होता. या महोत्सवात दैवाराधना, यक्षगानाचे सादरीकरण तसेच साहित्यिक चर्चा असलेल्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले होते.
गतवर्षी ११ मे रोजी सावंतवाडी राजवाड्याच्या पटांगणावर राजघराण्याच्या सन्माननीय व्यक्तिंच्या उपस्थितीत रंगलेला उडुपीच्या कानडी कलाकारांनी मराठी संवाद आणि गीतांसह सादर केलेला यक्षगानाचा खेळ सावंतवाडीकर रसिकांनी पाहिला होता. त्यावेळी श्रीमंत भोसले यांनी त्या खेळाचा घेतलेला आनंद व त्यासाठी घेतलेली मेहनत त्या यक्षगानमंडळीचे प्रमुख गुरू संजीव सुवर्णा यांनी पाहिली होती.
शिवाय नित्यनेमाने गेली तीन वर्षे राजवाड्याच्या परिसरात होत असलेला कोकणातील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य व वैभव असलेल्या ‘दशावतार’ खेळांचा महोत्सव ते राबवित असल्याची माहिती गुरू संजीव सुवर्णा यांना होती. असे कला व साहित्याला प्रोत्साहन देणारे, गुणीजनांचा गौरव करणारे व्यक्तिमत्व म्हणून ही मंडळी श्री भोसले यांना ओळखत होती. त्यामुळेच उडुपीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले होते.
