‘फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार’, राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘आमच्या सरकारच्या काळात…’

नागपूरमधील हिंसाचारासंदर्भातील टीकेवरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच संतापल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याच्या वृत्तावर राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. राऊत यांनी कोरटकरच्या नागपूर कनेक्शनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी नागपूर हिंसाचारावरुन व्यक्त केलेल्या शंकेवर साधण्यात आलेल्या निशाण्यावरही प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकार मनोरुग्णांचं सरकार 

पत्रकारांशी संवाद साधताना प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचं एका फोटोच्या आधारे सांगितलं जात आहे, असं म्हणत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे. “प्रशांत कोरटकर हा विषय महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडे आहे. फडणवीस हे देशातील महान व्यक्ती आहेत. प्रशांत नागपूरचा, दंगल पण तिथेच होते. दंगलीबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांवर मानसिक उपचार करण्याची गरज असल्याचं काल ते म्हणाले. हा प्रश्न फक्त मी नाही तर सगळ्यांनी विचारला आहे. फडणवीस यांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे. त्यावर उपचार करण्याची गरज आहे,” असं संजय राऊत म्हणाले. “उद्या कोरटकर भाजप कार्यालय किंवा मंत्र्याच्या बंगल्यात सापडू शकतो,” अशी शंकाही राऊतांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *