छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी (२२ मार्च) प्रशांत कोरटकर हा दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली.
सोशल मीडियावर प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रशांत कोरटकर आखाती देशातील कोणत्यातरी देशात उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे अरेबिक भाषेतील बोर्ड दिसत आहे. तसेच आखाती देशाची नंबर प्लेट असलेली गाडीही उभी असल्याचे दिसत आहे. हा फोटो आताचाच आहे की जुना? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. नागपूर पोलीस किंवा कोल्हापूर पोलिसांनीही यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राजकारणातून काही जणांनी यावर टिप्पणी केली आहे.
