भारतीय स्थलसेनेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील जवान नंदलाल शिरसाठ एका महिन्यासाठी गावाकडे आले होते. सालीच्या हळदीसाठी सासरी जात असताना शिंदखेडा येथे त्यांची दुचाकी हायवा गाडीला मागून धडकल्यामुळे या भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना 18 मार्च रोजी दुपारी घडली आहे.
शहादा तालुका लोणखेडा येथील नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१) हे भारतीय स्थलसेनेत शिपाई म्हणून कार्यरत होते. ते जम्मू येथील नवी ड्युटी ज्वाईन करण्यासाठी जाणार होते. तत्पूर्वी ते एक महिन्याची सुटी घेऊन गावाकडे आले होते. 2017 मध्ये त्यांचे लग्न पारोळा तालुक्यातील मोरफळ येथील माधुरी यांच्यासोबत झाले होते.
मोरफळ येथे सालीचा हळदीचा कार्यक्रम असल्याने नंदलाल शिरसाट हे लोणखेडा येथून मोरफळ जाण्यासाठी दुचाकी ( क्र. एम.एच.३९ ए.एफ.९५९२) 18 मार्च रोजी दुपारी जात असताना शिंदखेडा येथे साईनगर, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ हायवा गाडीत मागून धडकल्यामुळे जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण लोणखेडा गावावर शोककळा पसरली. नंदलाल शिरसाठ यांच्या पश्चात वडील यशवंत शिरसाठ, आई मीनाबाई, पत्नी माधुरी, मुलगा खुशाल व भाऊ असा परिवार आहे.
