गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. अशीच महाराष्ट्रत एक सर्वात मोठी रहस्यमयी नदी देखील आहे. कोकणात असलेली ही नदी सात गुहांमधून पृथ्वीच्या भेटीला येते. ही नदी जेथे आहे आहे ते कोकणातील सर्वात लोप्रिय पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर, घनदाट अरण्याने वेढलेले हे कोकणातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे.
सात गुहांमधून पृथ्वीच्या भेटीला आलेल्या कोकणातील या रहस्यमयी नदीचे नाव आहे हिरण्यकेशी नदी. सावंतवाडीपासून 35 कि.मी. वर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेल्या परिसरात एका मंदिराजवळ या नदीच्या उगमाची भेट होते. हे ठिकाण हिरण्यकेशी मंदिर नावाने ओळखले जाते. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते.
हिरण्यकेशी देवीचे मंदिर गुहेतच आहे. या गुहेतच नदीचा उगम झाला आहे. ही गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरा समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मीचू मूर्ती पहायला मिळते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. हिरण्यकेशी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड नेहमी पाण्यानं भरलेलं असतं. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही.
हिरण्यकेशी नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावाजवळ होतो. पुढे ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते. हिरण्यकेशीला जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सावंतवाडी आहे. सावंतवाडी स्टेशनपासून आंबोली 28 किमी अंतरावर आहे. या मार्गावर नियमित बसेस धावतात. स्वत:च्या वाहनाने जायचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावरुन येथे जाता येते.
