एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बस प्रदूषणविरहीत इंधनावर चालवण्यासाठी दीड वर्षापूर्वी ५,१५० विद्युत (इलेक्ट्रीक) बस पुरवठा करण्याचे कंत्राट हैदराबाद येथील ‘ईव्हरी ट्रान्स’ कंपनीला देण्यात आले होते. परंतु या कंपनीने आतापर्यंत केवळ २२० बसेसचा पुरवठा केला आहे. यातून एसटीचे १३ रुपये प्रतिकिलोमीटरचे नुकसान होत आहे. करारानुसार या कंपनीने ३१ जानेवारीपर्यंत १,३४५ बस पुरवठा करणे अपेक्षित होते. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचे कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच एसटी मंडळाने दिला आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांच्या हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एसटीतील ७५ टक्के बस भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्प्याने नवीन बस दाखल करणे क्रमप्राप्त आहे. नोव्हेंबर २०२३ रोजी एसटी महामंडळाने प्रदूषणविरहीत विद्युत इंधनावर चालणाऱ्या ५,१५० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हे काम हैदराबाद येथील ‘ईव्हरी ट्रान्स प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले होते.
