फडणवीसांच्या नागपुरात तरुणीला जिवंत पेटवले?

फडणवीसांच्या नागपुरात तरुणीला जिवंत पेटवले?

उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातील गुन्हेगारी कमी व्हायचे नाव घेत नाहीय. खंडणीवसुली, लूटपाट, हाणामारीच्या घटना नेहमीच्या झाल्या असताना एका अग्निकांडाने खळबळ उडाली. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमाराला येथील फुटाळा तलाव चौपाटी परिसरात २२ वर्षीय एका तरुणीला पेट्रोल ओतून जिवंत पेटवून देण्यात आल्याच्या घटनेने नागपूर शहर हादरले आहे. निकिता फुलवानी नावाच्या या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. २४ तास उलटूनही पोलिसांना धागेदोरे न मिळाल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.

राज्याचे नवे पोलीसप्रमुख प्रवीण दीक्षित विदर्भाच्या दौ-यावर असताना घडलेल्या या भीषण अग्निकांडाने पोलिसांची झोप उडाली आहे. पण नेमका धागा मिळत नसल्याने पोलीस अंधारात हात मारत आहेत. हा खुनाचा प्रयत्न असावा, असे पोलिसांचे प्रथमदर्शनी मत आहे. चेहरा आणि डोक्याचे केस जळलेल्या अवस्थेत मिळालेल्या या तरुणीचे तोंड रुमालाने बांधले होते. या तरुणीचे वडील सातीबर्डी भागात राहणारे असून; त्यांचा किराणा दुकान आहे.

मुलीचे पालक किंवा नातलग काही बोलत नसल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे. फुटाळा या गर्दीच्या परिसरात तरुण-तरुणींची सायंकाळी गर्दी असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी, दोन वर्षे बंद असलेल्या ‘फर्स्ट लव्ह’ नावाच्या हॉटेलच्या छतावरही ही तरुणी कशासाठी आणि कोणासोबत गेली होती? हे बाहेर आलेले नाही.

लोकांनी तिच्या किंकाळय़ा ऐकल्या होत्या व तेथून दोन तरुणांना पळून जातानाही पाहिले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेनंतर दोन तासांनी समोरच्या तलावात एका तरुणाने आत्महत्या केल्याने सारेच बुचकळय़ात पडले आहेत. तर अग्निकांडाशी या तरुणाच्या आत्महत्येचा संबंध नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *