होळीनंतर येणाऱ्या धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होतोय. धुळवडीच्या दिवशी मांसाहारी जेवणाची प्रथा आहे. त्यासाठी मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी झाली आहे. लोक रांगेत उभं राहून चिकन मटण खरेदी करत आहेत. सणाचे दिवस असले तरी मटणाच्या दरात वाढ झाली नसल्याने ग्राहक समाधानी आहेत. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ग्राहकांच्या सोयीसाठी मटणाच्या दुकानाबाहेर मंडप उभारण्यात आले आहेत.
आज धुळवळीचा दिवस त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटन शॉपच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटन शॉपच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे. तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.
ठाण्यात मटणाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी
ठाण्यात मटण प्रेमींची मटण दुकानाबाहेर भली मोठी रांग लागली आहे. होळी उत्सव साजरा केल्यानंतर धुळवडनिमित्त मटण खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी मटणाच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे. ठाण्यातील मटन दुकानाबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. होळीची पुरणपोळी आणि आज धुळवडीला मटण खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा. मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात मटण खरेदी करण्यासाठी भलीमोठी रांग लागली आहे. हलाल, झटका, मल्हार या राजकारणात न पडता सामान्य माणसाला मात्र होळीच्या निमित्तानं मटणावर मस्त ताव मारायचा आहे. त्यामुळे मटणाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. धुळवडीच्या दिवशी मटणाच्या किंमतीमध्ये वाढ न झाल्यामुळे देखील नागरिक समाधानी आहेत.
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात आज सकाळपासूनच धुळवडीचा रंगतदार उत्सव साजरा होत आहे. तरुण-तरुणी तसेच सर्वच वयोगटातील नागरिक होळीचा आनंद घेताना दिसत आहेत. नागरिक एकत्र येऊन एकमेकांना रंग लावत होळी आनंदामध्ये साजरी करत आहेत. प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळात महिलांसह नागरिक धुळवडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत.
