उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भोंगे बंदीची कारवाई करणार का? फडणवीस म्हणाले, ‘कुणालाही…’

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज लक्षवेधीच्या माध्यमातून प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा विषय सभागृहात चर्चेच्या पटलावर आला. भारतीय जनता पार्टीच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा विषयाकडे लक्ष वेधलं. यावेळेस देवयानी फरांदेंनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही उल्लेख केला. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी एक खोचक उत्तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला आणि त्यानंतर सदर प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

उत्तर प्रदेशमधील निर्णयाचा संदर्भ देत विचारला प्रश्न

लक्षवेधीमध्ये भोंग्यांचा विषय मांडताना देवयानी फरांदे यांनी, उत्तर प्रदेशातील सर्व भोंगे बंद केले आहेत. राज्यातही तशी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला. स्वपक्षीय आमदाराच्या या प्रश्नावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “तपास करुन कारवाई करण्यात येईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांनी खोचकपणे, “हे भोंगे बंद करू पण सकाळी 9 च्या भोंग्याचे काय करायचं?” असा सवाल संजय राऊतांचा थेट उल्लेख न करता केला.

भोंग्याचे आवाज नियंत्रणात राहतील याची जबाबदारी कोणाकडे?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, “दिवसा 55 व रात्री 45 डेसिबलची मर्यादा हवी,” असं नियमांमध्ये असल्याचं अधोरेखित केलं. “कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देता येणार नाही. निश्चित कालावधीसाठी परवानगी देवू. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणा-यांना परवानगी दिली जाणार नाही. परवानगी आहे की नाही हे तपासण्याची संबंधित पोलीस निरिक्षकांची जबाबदारी असेल. कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

थेट केंद्राकडे केल्यात काही मागण्या?

तसेच राज्य सरकारकडून या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांसंदर्भातील प्रकरणामध्ये थेट केंद्र सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्याचे संकेत फडणवीस यांनी प्रश्नाला उत्तर देताना शेवटच्या ओळीत दिले. “केंद्रालाही काही नियम बदलासाठी विनंती करत आहोत,” असं फडणवीस यांनी उत्तराच्या शेवटी म्हटलं.

मनसेचं आंदोलन

साधारण तीन-साडेतीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. मुंबईसहीत अनेक ठिकाणी यानंतर भोंग्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली. राज ठाकरेंकडून आजही अनेक कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये पक्षाने यशस्वीपणे राबवलेल्या मोहिमांमध्ये या भोंगाविरोधी आंदोलनाचा उल्लेख असतो. पक्षाने केलेली कामं लोकांपर्यंत पोहचवली पाहिजेत असं आवाहन करताना राज यांनी अनेकदा या आंदोलनाचा उल्लेख केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *