हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. राणे म्हणाले, “आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल. याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल. मांस विक्री करणारी व्यक्ती हिंदू असेल.”
दरम्यान, नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला आवाहन केलं आहे की त्यांनी मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं. नितेश राणे यांच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून राणे यांना चिमटा काढला आहे.
