मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झालेत. मुंबईत पारा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यानं शहरातील नागरिकांना उष्माघाताचा धोका जाणवत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळं मुंबई महानगरपालितेनं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यानुसार गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
महाराष्ट्रात पश्चिमेकडील जिल्ह्यांसह विदर्भातही उन्हाचा कडाका वाढत असून, तापमानाचा आकडा 38 अंशांपलिकडे पोहोचला आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत असून, कोकणातील काही भागांमध्ये मात्र हवामानाची विचित्र स्थितीसुद्धा अनुभवता येत आहे. पश्चिम महाराष्ट्रावरील घाटमाथ्याच्या क्षेत्रात सकाळच्या वेळी धुक्याची चादर असून दुपारच्या वेळी मात्र सूर्य आग ओकताना दिसत आहे. तर, किनारपट्टी भागामध्ये दमट हवेमुळं उष्मा अधिकच जाणवण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळं राज्यात उष्णतेच्या लाटा दिवसागणिक तीव्र होत असल्याचच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मुंबई शहरात मंगळवारी उष्ण- दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारप्रमाणंच मंगळवारची दुपारही अधिक तापदायक ठरणार असून, मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम राहील. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या वातावरणीय दाबामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. मार्च महिन्यात हीच स्थिती कायम राहून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पर्वतीय भागांवर पावसाचा मारा…
देशातील पर्वतीय भागांमध्ये एकिकडे हिमवृष्टी सुरु असतानाच दुसरीकडे मात्र पावसानंही हजेरी लावली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. हिमाचल प्रदेशात पुढील 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, किलाँग क्षेत्रात हलक्या बर्फवृष्टीच्या अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये ढगाळ वातावरणासह इथं डोंगराळ भागाला पाऊसधारांचा मारा सोसावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
