पाकिस्तानच्या ‘या’ शहरात आहे श्रीराम पुत्र लव यांची समाधी; राजीव शुक्लांनी पहिल्यांदाच समोर आणले Photo

भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारलेली असतानाच आता या सामन्याआधी संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी X च्या माध्यमातून हे फोटो सर्वांच्याच भेटीला आणल्यामुळं एका नव्या गोष्टीकडे संपूर्ण भारताचं लक्ष वेधलं आहे.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेला सामना पाहण्यासाठी शुक्ला पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. गद्दाफी स्टेडियममध्ये या सामन्याचा आनंद घेतल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी लाहोर इथं असणाऱ्या एका खास मंदिरात केले आणि तिथं असणाऱ्या एका किल्ल्यालाही भेट दिली. हे तेच ठिकाण आहे, जिथं प्रभू श्रीराम यांचे सुपुत्र लव यांचीही समाधी असल्याचं म्हटलं जातं.

‘लाहोरच्या प्राचीन किल्ल्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांची प्राचीन समाधी आहे. लाहोरचं नावही त्यांच्याच नावावरून देण्यात आलं आहे. तिथं जाऊन नतमस्तक होण्याची संधी मिळाली. सोबत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवीसुद्धा होते. ते या समाधीचा जिर्णोद्धार करून घेत आहेत. मोहसीन यांनी मुख्यमंत्रीपदी असताना हे काम हाती घेतलं होतं. लाहोरच्या नगरपालिका नोंदींमध्ये ही बाब नमूद आहे की हे नगर भगवान श्रीराम यांचे पुत्र लव यांच्या नावावरून वसलं असून, कसूर शहराला त्यांचे दुसरे पुत्र कुश यांच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारनंही या गोष्टीला मान्यता दिली आहे’, असं शुक्ला यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये लिहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *