‘त्या’ एका चुकीमुळे 14.8 किलो सोन्याची तस्करी करणारी अभिनेत्री एअरपोर्टवर पकडली गेली

पोलीस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आणि अभिनेत्री रान्या रावला 14.8 किलो सोन्याची तस्करी करत असताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. बंगळुरुमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) रविवारी संध्याकाळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली रान्याला अटक केली.दुबईहून आलेल्या रान्याला तिच्या शरीरावर बांधलेल्या बेल्टमध्ये लपवलेल्या 14 किलो 800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसहीत पकडण्यात आले. या सोन्याची किंमत 12 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. रान्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कालावधीत पोलीस रान्याची चौकशी करणार असून प्राथमिक चौकशीमध्येच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अवघं एक पाऊल दूर होती

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रान्याला विमानतळावर थांबवून तिची चौकशी करण्यात आली. सुरक्षेचं कडं भेदून रान्या बाहेर पडण्यापासून अवघी एक पाऊल दूर होती  तितक्यात तिला रोखण्यात आलं. रान्या एमरिट्सच्या विमानाने 3 मार्च रोजी बंगळुरु विमानतळावर दाखल झाली. तिच्या अंगावरील बेल्टमध्ये 14.8 किलो सोनं सापडलं. तिच्याविरुद्ध कस्टम कायदा 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी रान्याच्या बंगळुरुमधील घरी छापेमारी केली. या ठिकाणीच ती पतीबरोबर वास्तव्यास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

घरी सापडली चार कोटींहून अधिकची रक्कम

रान्याच्या घरी केलेल्या छापेमारीमध्ये 2.06 कोटींचं सोनं आणि 2.67 कोटी रुपये मूल्याची रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 17 कोटी 29 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या दोन गोष्टींमुळे आला संशय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या राव मागील 15 दिवसांमध्ये 4 वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळेच तिच्याबद्दल संशय बळावला. याच संशयामधून पोलिसांनी रान्यावर लक्ष ठेऊन या वेळेस ती भारतात परतल्यानंतर कारवाई करण्यात आली. तसेच रान्यावर शंका घेण्यासाठी अजून एक गोष्ट कारणीभूत ठरली. ती म्हणेज दुबईला जाताना आणि तिथून येता रान्या एकाच ड्रेसमध्ये प्रवास करताना दिसली. चारही वेळेस तिने हाच ड्रेस परिधान केल्याने अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला. चार वेळा एकच ड्रेस वापरण्याची चूक रान्याला भोवली आणि ती अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

…म्हणून होत नसे तपासणी

पोलीस महासंचालकाची मुलगी असल्याने रान्या विमानतळावर तापसणीला बगल देत बाहेर पडायची असं प्राथमिक माहितीमध्ये समोर आलं आहे. आता या प्रकरणात तिला अजून कोणाची साथ आहे, हे मोठं रॅकेट आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *