छेड काढणाऱ्या भाच्याच्या डोक्यात मामानेच घातला दगड! जागीच मृत्यू

सांगलीच्या कुपवाडमध्ये भाच्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मामासह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. राहुल सूर्यवंशी, वय 38, असं मृत तरुणाचं नाव आहे. नात्यातील मुलीची छेडछाड करत असल्याच्या रागातून राहूल याचा हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी मामा संदीप सावंत वय 52 व मुलगा सौरभ सावंत वय 22 या तरुणाला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाशनगर येथे ही घटना घडली आहे.

मृत राहूल सूर्यवंशी हा काही महिन्यापूर्वी काही कामानिमित्त सांगलीमधील कुपवाड या गावात आला होता. कुपवाडमधील औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीमध्ये तो काम करत होता. राहूल सूर्यवंशी याचे मूळ गाव कर्नाटक राज्यातील येडूर मांजरी आहे.

कुपवाडमध्ये औद्योगिक वसाहतमध्ये काम करत असणारा राहूल सूर्यवंशी हा आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीची गेल्या आठ ते दहा दिवसापासून छेड काढत होता. गेल्या काही दिवसांपासून राहूल छेड काढत असल्यामुळे पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी राहूल सूर्यवंशीला अनेक वेळा समज देखील दिला. परंतु, राहूलने अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचे बंद केले नाही. राहूल सूर्यवंशी हा मंगळवारी दुपारी घरात एकटाच होता. त्यावेळी देखील त्याने पीडित मुलीची पुन्हा एकदा छेड काढली. समज देऊनही राहूल त्रास देत असल्यामुळे नातेवाईकांचा देखील राग अनावर झाला.

पुन्हा एकदा पीडित मुलीची छेड काढल्याचं नातेवाईकांना समजलं. सौरभ सावंत आणि राहुलचा मामा संदीप सावंत यांना राग अनावर झाला नाही. त्यांनी थेट राहुल सूर्यवंशीला पकडून मारहाण केली. यामध्ये संदीप सावंत याने देखील लोखंडी रॉडने हल्ला केला. तर सौरभने तिथच असलेला दगड हातात घेऊन राहुल सूर्यवंशीच्या डोक्यात घातला. दगड डोक्यात घालताच संशयित फरार झाले. डोक्यात दगड घातल्यामुळे राहुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी संदीप सावंत आणि सौरभ सावंत या दोघांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *