पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीच्या कामाला येत्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (५ मार्च) सर्व उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे क्षेत्र ५२,००० चौरस मीटरपर्यंत पसरलेले आहे. त्यामध्ये १० उन्नत पूल, ३४ आगमन नोंदणी कक्ष, २५ स्वयंचलीत नोंदणी कक्ष, ५ प्रवाशी पिशव्या तपासून प्रवाशांपर्यंत पोहचणारी यंत्रणा (बॅग्ज कॅरोसेल) आहेत. पुणे विमानतळावर दिवसेंदिवस उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याने जुन्या टर्मिनलची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीमुळे विमानांची वाहतूक नवीन टर्मिनलवर टप्प्याटप्याने स्थलांतरीत करण्यात येत आहे. सध्या जुन्या टर्मिनलवरून १६ विमानांची उड्डाणे होतात. येत्या पाच मार्चपासून ही पूर्ण उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होणार आहेत. जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
