आरतीच्या वादात राजकीय टाळ; वाळकेश्वरमधील महादेव मंदिरात ठाकरे गटाकडून पूजा

वाळकेश्वर येथील जब्रेश्वर महादेव मंदिरात सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरती केली. तसेच मनसेच्या नेत्यांनीही परिसराला भेट दिल्याने येथील आरतीच्या वादाला राजकीय रंग चढले आहेत. जब्रेश्वर मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीविरोधात स्थानिक गृहनिर्माण संकुलांतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला मराठी-अमराठी वादाचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात आरती करणारे सर्वभाषिक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

वाळकेश्वर बाणगंगा परिसराला लागूनच जब्रेश्वर महादेव मंदिर असून, १८४० मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली होती. येथे दर सोमवारी रात्री ९ ते ९.३० या वेळेत नगाडा व शंखाच्या नादात आरती केली जाते. परंतु यामुळे होणारा आवाज, आरतीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींविरोधात स्थानिक गृहसंकुलांतील काही रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क करून तक्रारी केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत वाद सुरू होता. दीड महिन्यापूर्वी झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना बोलावून वाद मिटवला होता. परंतु आता महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *