शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना १ ते १० मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४६ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यंदा राज्यातील ८ हजार ८५३ शाळांमधील १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
