केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्टात मुलींचे खाते काढून देण्याचा आपण सुरु केलेला उपक्रम कधीही बंद पडू देणार नाही, या योजनेच्या माध्यमातून माझे वडील स्व.बालाजीराव पाटील रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केले. रातोळी ता.नायगाव येथे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 1 हजार मुलींना पोस्टाचे पासबूक वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. रातोळी येथील पोलीस पाटील कै.बालाजीराव मारोतराव पाटील रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन व सुकन्या समृद्धी योजनेतील 1 हजार लाभार्थी मुलींना मान्यवरांच्या हस्ते पासबुक वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना रातोळीकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धी योजना सुरु केल्यापासून आपण जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने लाभार्थी मुलींचे पोस्ट खात्यामार्फत खाते काढून त्यांना पासबूक वाटप केले जात आहे. माझे वडील पोस्ट खात्यात सेवेत होते त्यामुळे या खात्याविषयी कौटुंबिक जिव्हाळा म्हणून ही योजना आपण हाती घेतली आहे, या मागे कुठलेही राजकारण, स्वार्थ असण्याचे कारण नाही. जीवनात कुठल्याही ऋणातून आपल्याला मुक्त होता येते परंतु जन्मदात्या आई-वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, याची जाणीव ठेवून अशा प्रकारच्या विविध सामाजिक उपक्रमातून आपण माता-पित्यांचे स्मरण केले पाहिजे, असे भावनिक उद्गारही रातोळीकर यांनी आपल्या भाषणात काढले.
