मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ‘एमएमआर ग्रोथ हब’चा अंतिम आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, ‘एमएमआर’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करताना अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. राज्याप्रमाणेच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई आय’सह नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे ‘थीम पार्क’ही प्रस्तावित करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे अर्थात एमएमआरमध्ये अनेक रिसॉर्ट, थीम पार्क आणि वॉटर पार्क आहेत. मात्र पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. एमएमआर ग्रोथ हबच्या अंतिम आराखड्यानुसार नवी मुंबईच्या दक्षिणेला थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये रिसॉर्ट, अॅनिमेशन स्टुडिओ, राईड्स झोन, वॉटर पार्क अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
‘मुंबई आय’ आता पालिकेकडे
गेल्या कित्येक वर्षे चर्चेत असलेला पण प्रत्यक्षात न साकारलेला ‘मुंबई आय’ हा प्रकल्प आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारला जाईल. मुंबई पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’कडील हा प्रकल्प आता पालिकेच्या माथी मारला जात असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक रहिवासी संघटनांनी या प्रकल्पाला आधीच विरोध सुरू केला असून त्याविरोधात ऑनलाइन याचिकाही तयार करण्यात आल्या आहेत. आधी चांगल्या सोयी सुविधा द्या, अशी मागणी रहिवासी संघटना करीत आहेत.