सातारा: रेशन धान्याचा अपहार करत विक्री केल्याप्रकरणी गुन्हा

रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांच्या हक्काचे १ लाख ४१ हजारांचे धान्य अपहार करत बाजारात विकल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. राजेंद्र सुभेदार जाधव, खानापूर (ता. वाई)  असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वाई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार समीर बेग महम्मद बेग मिर्झा यांनी वाई पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दि. १६ रोजी सव्वाएकच्या सुमारास खानापूर गावच्या हद्दीत स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव यांच्याकडून रेशन धान्याचा अपहार करत असल्याची माहिती बेग यांना मिळाली. त्यांनी दुकानावर जाऊन स्टाॅक रजिस्टर तपासले. त्या वेळी रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे दुकानदाराकडे दि. १६ पर्यंत एकूण गहू १०४५ किलो शिल्लक असणे गरजेचे होते; परंतु ३९५ किलो गहू कमी आढळून आला; तसेच एकूण ७१४ किलो वजनाचे तांदूळ शिल्लक असणे अपेक्षित असताना ३२८ किलो तांदूळ जास्तीचे दिसून आले. नोंदीनुसार २ किलो साखरही शिल्लक नव्हती. तसेच जाधव यांच्या दुकानाशेजारील घरात अंदाजे ५० किलोची ५० पोती गव्हाची व ५० किलोची ५ तांदळाची पोती जास्तीची मिळून आली. दुकानाशेजारील बोळामध्ये २५ किलो तांदूळ व १५ किलो गहू शासकीय बारदानात मिळून आले. राजेंद्र जाधव यांच्या रास्त भाव दुकानात अनियमितता दिसल्याने समीर बेग यांनी १ लाख ४१ हजार २२० रुपयांच्या धान्याच्या अपहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी राजेंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बिपीन चव्हाण तपास करत आहेत.

दरम्यान, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांनीही गतवर्षी वर्णे (ता. सातारा) येथील विकास सोसायटीच्या रेशन दुकानाचे रजिस्टर तपासणी करून २ लाख ७३ हजार ४०० रुपयांच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *