सोसायटी विरूद्ध श्वानप्रेमी वाद, आदेशानंतरही भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखले

सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांना खायला देणाऱ्या एका सदस्याच्या गृहसेवकाला सोसायटीत प्रवेश करण्यास रोखू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, न्यायालयाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित करून न्यायव्यवस्थेबाबत अपशब्द वापणारे पत्रक प्रसिद्ध करणाऱ्या नवी मुंबईस्थत सीवूड्स इस्टेट सोसायटीच्या सांस्कृतिक संचालक विनीता श्रीनंदन यांना शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, त्यांच्यावर अवमान कारवाई का करू नये हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. कायदा न जुमानणारा सुशिक्षित समाज नको, अशी टिप्पणीही न्यायालयाने ही नोटीस बजावताना केली.

न्यायालयीन व्यवस्था लोकशाही चिरडत आहे, यासारखी विधाने श्रीनंदन यांनी सोसायटीतील अन्य सदस्यांना ई-मेलद्वारे लिहिलेल्या पत्रात केली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः श्रीनंदन यांनी पाठवलेल्या पत्राबाबत संताप व्यक्त केला. श्रीनंदन यांची ही कृती वैयक्तिक होती की सोसायटीच्या संचालक मंडळाने एकत्रितपणे ती केल्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. श्रीनंदन यांच्या पत्रातील न्यायव्यवस्थेबाबत लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकूरामुळे आपण खूप अस्वस्थ झाल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, सोसायटीच्या संचालक मंडळाने श्रीनंदन यांच्यासह ही कृती केल्याचे आढळल्यास संचालक मंडळाच्या सदस्यांवर देखील फौजदारी अवमान कारवाई करू, असा इशाराही खंडपीठाने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *