अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रम्प इराणचे लक्ष्य असल्याचे वारंवार बोलले जात होते. आता याबाबत खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या सल्लागारांना मंगळवारी निर्देश दिले की, जर इराणने माझी हत्या केली, तर त्यांना समूळ नष्ट करा. इराणवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली, यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी वरील विधान केले.
निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणने रचला होता असा आरोप नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने केला होता. फरहाद शकेरी (५१) या स्थलांतरीत नागरिकाने ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवून त्यांची हत्या करण्यासाठी इराणी अधिकऱ्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. शकेरी सध्या इराणमध्ये आहे.
इराणविरोधात कडक निर्बंध
इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यांनी इराणविरोधात यापुढे कडक धोरण अवलंबले जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी इराणच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले आहे. इराणने अण्वस्त्र तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर हे निर्बंध लादणे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.