जानेवारी अखेरीस बुलढाणा शहरात दुर्मिळ वैद्यकीय घटनेची नोंद झाली. ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’, असलेल्या ‘त्या’ महिलेची ‘प्रसुती’ झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघे मायलेक सुखरूप आहे. लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील अर्भक काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या अगोदर या मातेला प्रसृती साठी संभाजीनगर येथे पाठवण्याचे नियोजन होते. मात्र अखेर बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलेने सुमारे सव्वा दोन किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला. नवजात बाळाच्या पोटातील अर्भकाला काढून टाकण्यासाठी अमरावती येथील शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले. तेथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पॅडियाट्रीक सर्जन उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. नवजात बाळाची शस्त्रक्रिया कधी करायची याचा निर्णय अमरावती येथील तज्ज्ञ घेणार आहे
स्त्री रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात डॉ. संतोष वानखेडे, डॉ. प्रसाद अग्रवाल, डॉ. सुरेखा मेहेर आणि डॉ. संजीवनी वानेरे यांच्या चमुने ही प्रसूती सुखरूपपणे पार पडली. त्यांना भूलतज्ञ डॉ. प्रविण झोपे, डॉ. रेणुका हिंगणे यांचे सहकार्य लाभले. सदर महिला ही जिल्ह्याच्या घाटाखालील भागातील असून तिचे वय बत्तीस वर्षे आहे. तिला याआधी दोन अपत्य आहेत.
फिट्स इन फिटू
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सव्विस जानेवारी रोजी करण्यात आलेल्या गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी मध्ये महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे. आढळून आले. फिट्स इन फिटू असे शास्त्रीय नाव असलेल्या प्रकारच्या घटना देशात पंधरा ते वीस घडल्या. जगात अश्या दोनशे प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे या घटनेने राष्ट्रीय माध्यमाचे आणि वैदकीय क्षेत्राचे लक्ष वेधले होते.