भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जवळपास 13 वर्षांनी रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) सामना खेळत असल्याने त्याचे फॅन्स उत्साहीत होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवार पासून सुरु झालेला दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना पाहण्यासाठी विराटाच्या फॅन्सनी स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठी धावसंख्या करणारा विराट कोहली 2012 नंतर पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला.
युवा गोलंदाजाने विराटला फसवलं :
रेल्वे संघाचा स्टार गोलंदाज हिमांशु सांगवानने विराट कोहलीची विकेट घेतली. हिमांशुने टाकलेल्या एका बॉलवर विराटने स्ट्रेट ड्राइव मारून चौकार लगावला. त्यावेळी विराट जबरदस्त फॉर्मात दिसत होता. परंतु त्याच्या पुढच्याच बॉलवर हिमांशुने वेगवान बॉल टाकून विराटला फसवलं. विराट या बॉलवरही चौकार मारण्याच्या प्रयत्नात होता. जर बॉल बॅटवर लावला असता तर तसे झाले देखील असते, परंतु तसं होऊ शकलं नाही. बॉल बॅट आणि पॅडच्या मधून निघाला आणि त्याने ऑफ स्टंपला उडवला. विराटचा ऑफ स्टंप हवेत उडाला. हे पाहून विराट आणि त्याचे फॅन्स अवाक झाले. विराटला बाद केल्यावर गोलंदाज हिमांशु आणि त्याच्या संघाने आक्रमक सेलिब्रेशन केले. विराटने 15 बॉल खेळून 6 धावा केल्या. दरम्यान त्याने एक चौकार लगावला. विराट कोहली बाद झाल्यावर अनेक चाहते सामना सुरु असताना स्टेडियम सोडून बाहेर गेले.