भिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्हीतील संशयीताचा चेहरा व अटक आरोपीचा चेहरा यांचा पडताळणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. न्यायावैद्यक अहवालानुसार आरोपीचे छायाचित्र व सीसीटीव्हीतील व्यक्तीचा चेहरा एकाच व्यक्तीचा असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) विरोधात पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.
आरोपी १६ जानेवारी रोजी इमारतीमधील जिन्यावरून चढून वर आला आणि सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा जहांगीरला उचण्यासाठी धावल्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्याचवेळी सैफ अली खान आणि करिना दोघेही तेथे पोहोचले. हल्लेखोराने चाकूने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता मध्ये पडल्या. आरोपीने केलेल्या हल्ल्यात त्याही जखमी झाल्या. आरोपीला १९ जानेवारी रोजी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली होती.