बीकेसीमध्ये ‘बेस्ट’ धावणार सुस्साट

बीकेसीमध्ये ‘बेस्ट’ धावणार सुस्साट

शहराचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र असणा-या वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये (बीकेसी) येत्या काही दिवसात बेस्ट बस सुस्साट धावताना दिसणार आहे. बीकेसीमध्ये मोठय़ा संख्येने नागरिकांची ये-जा पाहता त्यांना सोयीस्कर वाहतुकीचे साधन उपलब्ध व्हावे तसेच वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी एमएमआरडीएने ‘बेस्ट’ मार्ग अवलंबिला आहे.

वांद्रे-कुर्ला जोडरस्त्यावर बेस्ट बससाठी ३.५ मि.मी. रुंदीच्या राखीव मार्गिकांची रचना करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएद्वारे सांगण्यात आले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकार आणि निम्न सरकार मान्य कंत्राटदारांकडून निविदाही मागवल्या आहेत.

अनेक शासकीय आणि व्यावसायिक कार्यालये असणा-या बीकेसी परिसरात वाहनचालकांची, नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. खासगी वाहनांचा वाढता वापर, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे यासाठी बीकेसीत राखीव बेस्ट बस मार्गिकांची रचना करण्यात येणार आहे.

हा राखीव मार्ग एमटीएनएल जंक्शनपासून कलानगर जंक्शनपर्यंत आणि त्यापुढे पश्चिम द्रूतगती महामार्गाजवळील ओएनजीसी इमारतीपर्यंत असेल. या राखीव मार्गिकेचे महत्त्व निदर्शनास यावे यासाठी ही राखीव मार्गिका ठरावीक रंगांनी आखली जाईल. इतर वाहनांनी या मार्गिकेत शिरकाव करू नये यासाठी ही मार्गिका स्प्रिंग बोलार्ड्सद्वारे आरक्षित करण्यात येणार आहे. या मार्गावर माहिती फलकही असतील.

सध्या बसद्वारे एमटीएनएल जंक्शनपासून कलानगर जंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. मात्र राखीव मार्गिकांमुळे हे अंतर अधिक जलद गतीने, सुरक्षित कापणे शक्य होईल आणि बससेवा अधिक नियमितपणे उपलब्ध होतील. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे.

सुरुवातीला केवळ बेस्ट बससाठी राखीव असणारी ही मार्गिका भविष्यात इतर प्रवासी बससाठी खुली करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. या राखीव मार्गिकांमुळे अधिकाधिक प्रवासीवर्ग बेस्टकडे वळल्याने तोटय़ात अडकलेल्या बेस्ट सेवेला निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *