पालघर: कानात इअरफोन घालून रेल्वेरूळ ओलांडणे एका सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतले आहे. सफाळे रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. वैष्णवी मयूर रावल असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सध्याच्या मोबाईल युगात शालेय, महाविद्यालय विद्यार्थी, तरूण-तरूणी सर्वांकडेच मोबाईल असतो. कानात इअरफोन, हेडफोन घालून मोबाईमधून मोठ्या आवाजात गाणी ऐकून बहुतांशजण प्रवास करत असतात. इअरफोन घातल्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही व आजूबाजूला काय सुरू आहे, याबाबत देखील कोणता ठाव ठिकाणा राहत नाही. त्यामुळे रेल्वेरूळ अथवा रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच काहीशी दुर्दैवी घटना सफाळे रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. इअरफोन कानात घालून रेल्वेरूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
वैष्णवी मयूर रावल ही सोळा वर्षाची इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पालघर तालुक्यातील माकणे येथे रहिवासी असून तिचा क्लास संपवून घराकडे निघाली होती. माकणे येथे जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते. पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून सफाळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडात असताना, वैष्णवीने कानात इअरफोन घातले होते. रेल्वेरूळ ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव राजधानी एक्स्प्रेस ट्रेनने तिला जोरदार धडक दिली.
