वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदाराची यादी यंदाही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तयार केली आहे. संपूर्ण मुंबईतील अशा ५०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांनी २०१० पासून किंवा त्याआधीपासून पालिकेचा तब्बल ३९८१ कोटी मालमत्ता कर थकवला आहे. या थकबाकीदारांमध्ये मोठे विकासक, आस्थापना, राज्य सरकारचे विविध विभाग यांचा समावेश आहे.
भाडे मूल्याधारित करप्रणाली बंद करून पालिकेने २०१० मध्ये भांडवली मूल्याधारित करप्रणाली आणली. मात्र या करपद्धतीविषयी अनेक तक्रारी होत्या. या तक्रारी सोडवण्यात अपयश आल्यामुळे अनेक मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते.
राज्य सरकारच्या विविध विभागांचा समावेश
थकबाकीदारांमध्ये पालिकेचे विभागही थकबाकीदारांमध्ये कमला मिल, रघुवंशी मिल अशा मोठ्या आस्थापना आहेत. तसेच शासकीय विभागांचाही यात समावेश आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या काही इमारतींचा मालमत्ता करही थकीत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही मालमत्ता कर थकवला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे.
