मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाला आहे. २३ सप्टेंबर रोजी मानखुर्दच्या रेल्वे रुळावर सापडलेला अज्ञात मृतदेह शशिकला मालदी यांचा असल्याचे समोर आले आहे.
प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शशिकला मालदी यांच्या आकस्मिक मृत्यूच्या बातमीने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्या नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ८८ मधून निवडून आल्या होत्या. त्या राखीव प्रभागातून निवडून आल्या होत्या.
विरोधकांकडून त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती. जात प्रमाणपत्र मिळवण्यात त्यांना काही अडचणी येत होत्या. २३ सप्टेंबरला शशिकला बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
अखेर शुक्रवारी सकाळी २३ सप्टेंबरला सापडलेला तो अज्ञात मृतदेह शशिकला यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. शशिकला मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होत्या अशी चर्चा आहे मात्र नगरसेवक पद रद्द होईल या भितीने त्या जीवन का संपवतील ? अशीही चर्चा होत आहे.
