‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढरगडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला आहे.
मांढरदेव (ता. वाई) येथील काळूबाई यात्रा दर वर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमा) भरते. यात्रेनिमित्त प्रशासनाकडून आज जिल्हा सत्र न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्ही आर जोशी, जिल्हा सत्र न्यायाधीश (वाई) आर एन मेहरे व उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त ॲड. माणिक माने, अतुल दोशी, सुनील व चंद्रकांत मांढरे, ॲड. पद्माकर पवार, वाईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी सर्व ट्रस्टी, निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे आदींच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
