मालाडमधील प्राण्यांच्या दहनवाहिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या पीएनजीच्या खर्चात बचत झाल्याने पालिकेवरील आर्थिक ताण काही अंशी कमी झाला आहे. पूर्वी दहनवाहिनीसाठी प्रतिमहिना लागणाऱ्या नैसर्गिक वायूसाठी पालिकेला एक ते सव्वा लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने दहनविधीसाठी दोन वेळा निश्चित केल्या. त्यांनतर नैसर्गिक वायूसाठी येणारा खर्च ४०-४५ हजार रुपयांवर आला आहे.
पालिकेचे पशुवैद्याकीय आरोग्य खाते आणि ‘पी’ उत्तर विभाग कार्यालय यांनी मिळून मालाड येथील एव्हरशाइन नगरात १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्राण्यांसाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली. मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने दहन करावे, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात होती. त्यानुसार पालिकेने दहनवाहिनीसाठी नैसर्गिक वायूचा वापर सुरू केला. विनाशुल्क या ठिकाणी मोफत दहनविधी सेवा पुरविली जाते. या दहनवाहिनीची ५० किलोची क्षमता असून एकाच वेळी १० ते १२ किलोच्या पाच प्राण्यांवर दहनविधी करणे शक्य आहे. सुरुवातीला सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत प्राण्यांवर दहनविधी केले जात होते. दहनविधीपूर्वी १ ते दीड तास यंत्रणा सुरू ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे दहनासाठी कुठल्याही क्षणी प्राणी आणले जाण्याची शक्यता असल्याने दिवसभर संबंधित यंत्रणा सुरू ठेवली जात होती. मात्र, महिन्यानंतर नैसर्गिक वायूपोटी सुमारे १ लाख रुपये खर्च आला.
