चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांच्या गेले चार दिवस काम बंद आंदोलनानंतर सोमवारी कांदा लिलाव सुरू झाला. चार दिवस लिलाव खंड पडल्याने सुमारे ३२ कोटींची उलाढाल झाली नाही. दरम्यान या संपामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना आता दर कोसळल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.

सोमवारी पहाटे माथाडी कामगारांनी दाखल झालेला कांदा वाहनांतून उतरविला. सकाळी सहा ते नऊपर्यंत कांद्याचे वजन करण्यात आले आणि त्यानंतर लिलाव झाला. एकूण ४७२ मालमोटारींतून ४७ हजार २१६ क्विंटल कांदा दाखल झाला होता. लिलावाद्वारे कांद्याला प्रतिक्विंटल कमाल दर ४५३० रुपये तर सर्वसाधारण दर १८०० रुपये मिळाला. किमान दर प्रतिक्विंटल ३०० रुपये होता. यातून सुमारे आठ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. गेल्या १८ डिसेंबर रोजी कृषी बाजार समितीमध्ये सुमारे ४३ हजार क्विंटल कांदा दाखल झाला असता त्यास प्रतिक्विंटल कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये मिळाला होता. त्याही अगोदरच्या आठवड्यात कांद्याला कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर ३३०० रुपये मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *