मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या 15 वर

18 डिसेंबर रोजी मुंबईच्या समुद्रातील पर्यटक फेरी करणाऱ्या बोटीला भारतीय नौदलाच्या बोटीने धडक दिली. या बोट दुर्घटनेत 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. या घटनेनंतर 3 दिवसांनी आता या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या मुलाचे नाव जोहान पठाण आहे. याच बोट दुर्घटनेत त्याच्या आईचाही मृत्यू झाला. तो मूळचा गोव्याचा आहे. या मुलाचा मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. याआधी गुरुवारी या घटनेतील 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या नौकांसह नौदलाचे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव (SAR) ऑपरेशनमध्ये तैनात करण्यात आले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही जहाजांतील 113 जणांपैकी 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन जखमींसह 98 जणांना वाचवण्यात यश आले. नौदलाच्या यानाने सहा जणांना वाहून नेले, त्यापैकी दोन जण वाचले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बोट दुर्घटना नेमकी कशी घडली? 

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असणाऱ्या समुद्रामध्ये नौदलाच्या एका वेगवान बोटीची इंजिन चाचणी सुरू असताना नियंत्रण सुटले आणि ती वेगवान बोट थेट ‘नील कमल’ प्रवासी फेरी बोटला धडकली आणि ती बोट उलटली. यामध्ये 100 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. ही बोट गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेटाकडे जात होती. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डने जारी केलेल्या कागदपत्रांनुसार, या फेरी बोटला 84 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स घेऊन जाण्याची परवानगी होती, परंतु ती ओव्हरलोड होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने उघड केले.

दरम्यान, या घटनेमुळे सागरी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास देखील सुरु केला असल्याचं सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *