ज्येष्ठ नागरिकांना घरपोच उपचार

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच उपचार

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना मुंबई महापालिकेने आता घरपोच औषधोपचार सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोबाईल मेडिकल केअर युनिट तयार करण्यात येणार असून यात झोपडपट्टयांसह सर्वच ठिकाणच्या गरजू आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे. येत्या काही महिन्यांत ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात राबवली जाणार आहे.

मुंबईत सुमारे १२ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून त्यातील २१ टक्के हे दारिद्रय रेषेखालील आहेत. या नागरिकांना विरंगुळा केंद्र, वैद्यकीय सुविधा केंद्र व अन्य बाबींचा समावेश करत पालिकेने दोन वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले होते. त्यानुसार शहर व उपनगरातील विविध उद्यानांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे तयार करण्यात आली असून त्यांना पालिका शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमांसाठी वर्गही उपलब्ध करून दिला जातो. शिवाय, महापालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षातील एक दिवस आरोग्य तपासणी राबवण्याचा निश्चय महापालिकेकडून करण्यात आला आहे.

पूर्व उपनगरात मुलुंड आणि पश्चिम उपनगरात मालाड यांसह शहर भागातील एका ठिकाणी ही मोबाईल मेडिकल केअर युनिट तयार करण्यात येत असून या युनिटमध्ये एक डॉक्टर, नर्स यांच्यासह विविध वैद्यकीय मशीन व औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे सोपे जाणार आहे

हे युनिट चालवण्यासाठी संस्थांची निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संस्थांसह करार करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे युनिट सुरू केले जाईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांकडून समजते.

मुंबईतील अनेक झोपडपट्टयांमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तीत एकेक दिवस निश्चित करून हे युनिट त्या भागातील ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणार आहे.

याबाबत मुंबई महापालिकेतील नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची जांभेकर यांना विचारले असता, अशाप्रकारची संकल्पना महापालिकेच्या वतीने राबवण्याचा विचार असून संस्थांसोबत करार झालेला नाही. अंतिम करार झाल्यांनतरच हे युनिट सुरू केले जाईल, असे त्यांना सांगितले. शिवाय येत्या वर्षभरात हे युनिट सुरू करण्याचा महापालिकेचा विचार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *