फी भरता न आल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

फी भरता न आल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळेची फीस न भरू शकणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना जवळा झुटा (ता. पाथरी) येथे बुधवारी (ता.३०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. परळी येथे शिक्षण घेणारा हा विद्यार्थी फीसचे पैसे नेण्यासाठी गावी आला होता.
 
जवळा झुटा येथील रामा विठ्ठल बोचरे (वय १७) हा विद्यार्थी परळी (जिल्हा बीड) येथील एका निवासी आश्रम शाळेत दहावीचे शिक्षण घेत होता. आठ दिवसांपूर्वी तो फीस भरण्यासाठी पैसे घेण्यास गावी आला होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही.
 
घरात आजोबा, आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून, त्यांना दोन एकर जमीन आहे. शेतात पिकत नसल्याने रामाचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
 
रामा शिकावा अशी इच्छा असल्याने त्याला परळीतील निवासी आश्रमशाळेत ठेवण्यात आले होते. पैशांची व्यवस्था न झाल्याने रामा विवंचनेत होता. त्यात आजोबाची तब्येत ठीक नसल्याने मंगळवारी (ता.२९) त्यांना उपचारासाठी माजलगावला तो घेऊन गेला होता. तेथूनच परळीला जातो, असे घरच्यांना सांगितले; परंतु रामा परळीला न जाता रात्री उशिरा गावी आला व आपल्या शेतात गेला. तेथील ठिबक सिंचनाच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.३०) सकाळी उघडकीस आली.
 
पाथरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतीच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असताना आता शालेय विद्यार्थीही असा जीवन संपविण्याचा निर्णय घेत असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *