पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल

राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत. नोटाबंदी, करोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्ती, दोन वर्षे होत असलेला अति पाऊस आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत द्राक्षाला दर नसल्यामुळे गत चार – पाच वर्षांत पन्नास हजार एकरने द्राक्ष क्षेत्र कमी झाले आहे.

नोटाबंदीनंतर द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. यानंतर करोना टाळेबंदीचा दुसरा फटका बसला. त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत राहिला, असे द्राक्ष बागायतदार संघाच्या विज्ञान समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत अति पाऊस झाला आहे. वर्षभर सतत पाऊस होत राहिल्यामुळे यंदा द्राक्षाला अपेक्षित प्रमाणात घड लागले नाहीत. एकीकडे उत्पादन खर्चात वेगाने वाढ होत आहे. बिहार, उत्तर प्रदेशमधून मजूर आणावे लागत आहेत. औषधे, रासायनिक खतांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागांची काढणी करून फुलशेती, भाजीपाला आणि ऊस शेतीकडे वळत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *