पाकीट चोरल्याच्या संशयावरून झालेल्या भांडणातून हत्या

 पैशांचे पाकीट चोरल्याच्या संशयावरून झालेल्या भांडणातून ३३ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यत आल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात पार्कसाईट पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बळीराम निरहू चौहान (३३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील भानपूर येथील रहिवासी आहे. तो छोटीमोठी कामे करून उदरनिर्वाह करीत होता. मुंबईत पार्कसाईट परिसरातील लगीन सराई मैदानाजवळ तो वास्तव्याला होता. तेथेच आरोपी संगीतराव चव्हाणही राहत होता. हमालीचे काम करून चौहानला पैसे मिळाले होते. ती रक्कम ठेवलेले पाकीट काही दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. त्यामुळे तो संतापला होता. संगीतरावने पाकीट चोरल्याचा त्याला संशय होता. त्यावरून बळीराम संगीतरावसोबत भांडण करीत होता. त्याने दोन वेळा संगीतरावला मारहाणही केली होती. बळीराम व संगीतराव यांच्यात शनिवारीही वाद झाला.

त्यावेळी दोघांचाही परिचित असलेल्या विजय निघोड याने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या संगीतरावने चाकूने बळीरामवर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या बळीरामला घाटकोपर येथील राजावाडी रग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. याप्रकरणाची माहिती बळीरामचा भाऊ रामउग्रह चौहान(२८) याला देण्यात आली. त्यानुसार तो रुग्णालयात आला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरूवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. पण उपचारादरम्यान बळीरामचा मृत्यू झाला. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ हत्येचे कलम वाढवले. त्याच वेळी आरोपी संगीतरावला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. त्यांनी विक्रोळी परिसरात शोध घेतला असता संगीतराव विक्रोळी पश्चिम येथील लोअर डेपोपाडा येथे असल्याचे समजले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस ठाण्यात आणून चकशी केली असता त्याचा गुन्ह्यांतील सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतो. भंगार गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकून संगीतरावने बळीरामची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी चाकू हस्तगत केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *